सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून जुबेर अजीज जमादार याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी करणाऱ्या पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद लांडगेच्या टोळीतील तिघाजणांना गुंडाविरोधी पथकाने तुंग रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि एक चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे.
दिनांक ‘२० मे रोजी पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद मुसा लांडगे याने त्याच्या ३ ते ४ साथीदारांसह जुबेर अजीज जमादार याच्यावर वडिलार्जित जमिनीच्या कारणावरून चाकूने हल्ला करून त्यास जखमी केले होते. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात लांडगे व त्याच्या साथीदारांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्वजण परागंदा झाले होते. त्यांच्या शोधासाठी गुंडाविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली होती. २५ मे रोजी यातील संशयित रामचंद्र धोंडीराम लोंढे, अमर गंगाराम भागवत आणि संजय भीमराव जाधव यांना तुंग रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू व चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे. त्या सर्वाना पुढील तपासासाठी इस्लामपूर पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे. इर्शाद लांडगे टोळीवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीची वाळवा तालुक्यामध्ये मोठी दहशत होती. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, परमेश्वर नरळे, महेश आवळे, सचिन कुंभार, प्रफुल्ल सुर्वे, सागर लवटे, कुबेर खोत, वैभव पाटील, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांनी केली.