नाशिक | नुकताच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना, त्यांनी, राज्यांतील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्ध केली जाईल तसेच 17 हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येईल अशी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे अंगणवाडी मध्ये काम करू इच्छिणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे.
आदिती तटकरे यांनी पोषण माह अभियानावर भाष्य केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या , “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये ० ते ६ वयोगटाच्या बालकांसाठी सुपोषीत भारताची संकल्पना मांडली आहे. महाराष्ट्र राज्य हे पोषण माह उपक्रमात देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचे सर्व श्रेय अंगणवाडी शिक्षक यांना आणि सेविकांना जाते. सुपोषीत भारत अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे.
राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाचा उद्घाटनासाठी राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांच्यासह आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. तसेच यासाठी कोणत्या बाबी गरजेचे आहेत हे देखील पटवून दिले गेले.
विविध लाभांचे आणि पुरस्कारांचे वितरण
मुख्य म्हणजे, या कार्यक्रमात विविध लाभांचे व पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच, गर्भवती माता कौतुक सोहळा, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत धनादेश वाटप, बेबी केअर किट वाटप, महिला बचत गटांना कर्ज धनादेश वाटप, अशा सर्व लाभांचे वाटप केले गेले. यानंतर अंगणवाडी सेविका विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार, अंगणवाडी मदतनीस, वाडी केंद्र माचीपाडा, प्रकल्प, हरसूल. श्रीमती मंगल अंबादास सुबर, आशा सेविका, श्री. भारती रामदास गावित, अंगणवाडी सेविका यांना देण्यात आला.
दरम्यान, स्त्री हा कुटूंबाचा कणा असून ती स्वत: सुदृढ असेल तर तिचे कुटूंबही सुदृढ राहते. यासाठी अंगणवाडी सेविका व मतदनीस यांच्या कुटूंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. त्याचबरोबर, राष्ट्रीय पोषण अभियानात अधिकाधिक उपक्रम राबवून महाराष्ट्र राज्याचा देशात पहिला क्रमांक आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया असे आवाहन तटकरे यांनी केले.