कोरेगाव | जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी राजकारण झाल्याने शेवटच्या क्षणी पक्षाकडून मला अर्ज मागे घेण्यास सांगितले. पक्षावर असलेल्या विश्वासाने मी क्षणाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला. सध्याच्या विरोधी (भाजप) पक्षाकडून आमदारकीसाठी पक्षाची तिकीट देण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे व निष्ठेने केले. तेव्हा माझ्यावर राजकारण करून जरी कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी जिल्हा बँकेवर पुन्हा स्वाभिमानाने येईन, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी स्वकियांसह विरोधकांना दिला.
रहिमतपूर पालिका, रहिमतपूर विकास सेवा सोसायटी व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघार घ्यावी लागल्याने अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी येथे घेण्यात आला होता. त्या वेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, वासुदेव माने, अविनाश माने, बेदील माने, नंदकुमार माने, चांदगणी आतार, विकास तुपे आदी उपस्थित होते. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत सुनील माने यांच्याविषयी आदर व्यक्त करताना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची निंदा केली. त्याचबरोबर सुनील माने घेतील त्या निर्णयाबरोबरच राहण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.
या वेळी सुनील माने म्हणाले, ”राजकारणात नवीन संधी निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. जनता हीच माझी संधी आहे. १९९९ पासून आजपर्यंत पक्षाचे नाव खाली जाईल, अशा प्रकारचे वर्तन केले नाही. पक्षाकडून मिळालेल्या सर्व जबाबदाऱ्या मी ताकदीने पूर्ण केल्या. माझ्यावर राजकारण करून जर कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी जिल्हा बँकेवर पुन्हा येईन. रहिमतपूर पालिका व सोसायटीत निर्विवाद वर्चस्व मिळवून दाखवू.”