गरजू पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी ‘रिलीफ पुणे’ वेबसाईट ठरतेय वरदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | सतीश उगले

पुणे पिंपरी-चिंचवड भागामध्ये लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोचावी यासाठी काही तरूण इंजिनियर आणि डाॅक्टरांनी एकत्र येऊन गरजू, प्रत्यक्ष मदतकार्य करणारे आणि देणगीदार यांच्यासाठी reliefpune.in नावाची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवर विभागवार प्रत्यक्ष मदतकार्य करणारे, देणगीदार आणि गरजू यांची माहिती आणि संपर्क क्रमांक मिळवणे या वेबसाईटच्या माध्यमातून शक्य होईल.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात २४ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू अाहे. कोरोना हाॅटस्पाॅट भागामधील लाॅकडाऊन वाढण्याची देखील शक्यता आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारांनी लाॅकडाऊनचा अवलंब केला असला तरी, याची दुसरी दुर्दैवी बाजू ही आहे की, परप्रांतीय बिगारी कामगार, बेघर, अडकलेले स्थलांतरित मजूर, कचरावेचक, एकाकी वयोवृद्ध, दिव्यांग, तृतीयपंथीय, स्पर्धा परिक्षक इत्यादी लोकांचे रोजचे जगणे कठीण होऊन बसले आहे. अशा आणीबाणीच्या काळात प्रशासन, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, लोक व गट त्या लोकांपर्यंत मदतकार्य पोचवत आहेत.

पण गरजूंना मदत कुठे मिळते आहे? मदत करणाऱ्यांना गरजू नेमके कोणत्या भागात आहेत? तर देणगीदारांना देणगी कुठे द्यायची? इत्यादी प्रश्न लोकांना पडता. म्हणून अशा सर्वांना एका पातळीवर आणण्यासाठी, काही समविचारी डाॅक्टर आणि इंजिनियर यांनी मिळून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. [पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मदतकार्य वेगाने होण्यासाठी काॅमन वेबसाईट – (https://reliefpune.in/)]

ही वेबसाईट कुठल्याही सामाजिक संस्थेने बनवलेली नाही. वेबसाईट बनवणारा गट स्वतःकडे कुठलीही देणगी स्वीकारत नाही. मदतकार्यासाठी काम करणारा आणि गरजू यांना जोडण्याचे काम ही वेबसाईट करते.

या वेबसाईटची वैशिष्ट्ये

१. पुणे-पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या भागातील 200 हून अधिक मदतकार्यांची माहिती व संपर्क क्रमांक.

२. किराणा, जेवण, आसरा, साबण-सॅनिटायझर, पीपीई, घरपोच सेवा, वाहनसेवा, आरोग्यसेवा, हेल्पलाईन इ. विविध मदतकार्यांचा समावेश.

३. रोजंदारीवरचे कामगार, स्थलांतरित, बेघर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कचरावेचक, तृतीयपंथी, सेक्सवर्कर्स यांच्यासाठीच्या मदत कार्याचा समावेश.

४. शहरातील भाग, मदतीचे स्वरूप, मदत दिलेला समुदाय यानुसार मदतकार्य शोधण्याची सोय.

५. देणगी(वस्तू, धान्य, पैसे, स्वयंसेवक इत्यादी) देऊ इच्छिणा-या लोकांची यादी.

६. लोकांचा प्लॅटफॉर्म: या प्लॅटफॉर्ममध्ये लोकांना त्यांच्या माहितीतल्या मदतकार्याची भर घालता येईल. तसेच स्वतःला देणगी द्यायची असेल तर त्याचीही नोंद करता येईल.

७. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्लॅटफॉर्म उपलब्ध.

या प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा करता येईल?

१. जर तुम्ही गरजूंपर्यंत पोहचून प्रत्यक्ष मदतकार्य करत आहात, तर तुमच्या भागामधील देणगीदार आणि इतर मदतकार्ये यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. त्यांच्यासोबत भागीदारी करता येईल.

२. जर तुम्ही मदतकार्यासाठी देणगी (पैसे, धान्य, वस्तू, इतर.) देऊ इच्छिता, तर तुमच्या भागात चालू असणा-या किंवा तुम्हाला महत्त्वाच्या वाटणा-या मदतकार्यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. तुमच्या पसंतीस पडलेल्या मदतकार्याला देणगी देता येईल.

३. जर तुम्ही स्वतः गरजू आहात किंवा गरजूंच्या संपर्कातील व्यक्ती आहात, तर तुमच्या भागातील मदतकार्यांचा या प्लॅटफॉर्मवर शोध घेता येईल. मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

४. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, मेल इ. माध्यमातून तुमच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत या वेबसाईटबद्दल माहिती पोचवता येईल.

प्रदीप देवकाते, ऋतगंधा देशमुख, प्रवीण डोणगावे, निखिल जोशी, सायली तामणे, रविकांत पाटील, सनत हानी आणि सुजय काकरमठ या तरूणांनी एकत्र येऊन वेबसाईटची निर्मिती केली आहे. याबाबत अधिक माहिती देताना रविकांत म्हणाला, “कोरोनाच्या संकटामुळे सरकारला लोकडाऊनचा अवघड निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या अचानक वाढलेल्या अडचणी दिसू लागल्या. त्याचबरोबर त्यांच्यासाठी अहोरात्र काम करणारे व्यक्ती, गट, संस्था, प्रशासन दिसत होते. ह्यांना एकमेकांशी जोडलं तर मदतीचा वेगाने गुणाकार होईल असा वाटलं. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपयोगी येऊ शकतो अशी खात्री वाटली. म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म बनवायचं काम हाती घेतलं.”