राज्यपालांचे निवडणुक आयोगाला पत्र; विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी केली निवडणुकीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला एक पत्र लिहिले असल्याचे समजत आहे. कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणुक आयोगाला महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हि जमेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज्यातील विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कालावधी २४ एप्रिल रोजी संपला आहे. या रिक्त जागा भरण्याकरता एप्रिल महिन्यातच निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे केंद्रीय निवडणुक आयोगाने सर्व निवडणूक पुढे ढकलल्या. आता राज्य सरकारकडून ही निवडणुक पुन्हा घ्यावी, यासाठी केंद्रीय निवडणुक आयोग आणि राज्यपाल यांना पत्र देण्यात आल्याचे समजत आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी कोणत्यातरी एका सभागृहावर निवडून येणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ठाकरे यांच्या आमदारकीसाठी प्रयत्न केले जात आहेत. “केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात अनेक शिथिल उपायांची घोषणा केली आहे. काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका घेता येऊ शकतात”, असं राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Leave a Comment