राज्यातील मंदिरं आणि जीम पुन्हा सुरू करण्याबाबत संजय राऊतांचे मोठं विधान, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील मंदिरं आणि जीम पुन्हा सुरू करण्याबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या आकलनानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील धार्मिकस्थळं सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. राज्य अनलॉक होत असताना इतर गोष्टींवरील निर्बंध हटविले असताना प्रार्थनास्थळं पुन्हा उघडण्याची मागणी राजकीय स्तरातून जोर धरत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे.तर दुसरीकडे राज्यातील सर्व धर्मीय प्रार्थनास्थळं करावीत अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी या मागणीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही धार्मिक प्रार्थनास्थळं खुली करण्याचा आग्रह धरला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील मंदिरं सुरू न केल्यास १ लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा आंबेडकरांनी सरकारला दिला आहे. तर, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय समितीने मंदिरं सुरू करण्यासाठी शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment