हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे ठराव विधानसभेत एकमुखाने संमत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा ठराव विधानसभेत मांडला. त्यानुसार औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. त्यानुसार आता या शहरांच्या नामकरणाचा प्रस्ताव दोन्ही सभागृहाकडून केंद्र सरकारच्या गृहखात्याला पाठवला जाईल असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं
खरं तर राज्यातील ठाकरे सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथील विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारने हा निर्णय कायम ठेवला होता. त्यानुसार आज विधानसभेत एकमुखाने या नामांतराला संमती मिळाली.
यानंतर औरंगाबाद शहराच्या नामांतरानंतर औरंगाबाद येथील विमानतळाला सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे आणि राज्य सरकारने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा करावा, कारण ते सुद्धा आपण २ वर्षांपूर्वी विधानसभेत मंजूर करून घेतलं आहे अशी मागणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावर उत्तर देत त्याचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले