मुंबई । लॉकडाऊनला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आव्हान देणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या पेच प्रसंगांवर आपली मते परखडपणे मांडली.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करावी, याशिवाय मंदिरे खुली करण्यासाठी सर्व साधुसंतांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. ”मी स्वतः अकोल्यातील मंदिरे खुले करून आलो आहे. आता त्या ठिकाणी कावडही निघाली आहे. त्यात कोरोनाचा एकही रुग्ण निघाला नाही. साधुसंतांची जी मागणी आहे ती सरकारने मान्य करायला हवी.पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत. मी देखील तुमच्या सोबत आंदोलनाला उतरणार, असा शब्द मी त्यांना दिला आहे ” असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
राज्यात आंतरराज्य जिल्हा बंदी आहे. ही बंदी तात्काळ उठवून नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी. आतातरी लोकांचे दळणवळण सुरू व्हायला हवे, असे आवाहन आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. दिल्लीत केवळ मेट्रोसेवा बंद आहेत, मात्र इतर सर्व वाहतूक सुरू आहे तर उत्तर प्रदेशमध्येही परिवहन सेवा सुरू आहेत मग या बाबतीत महाराष्ट्र मागासलेला का दाखवता?, असा प्रश्न आंबेडकर यांनी विचारला. राज्यात लवकरात लवकर सार्वजनिक वाहतूक सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”