Wednesday, March 29, 2023

देशातील पहिल्या रो-रो रेल्वेला हिरवा झेंडा; सोलापूरपासून बंगळूरपर्यंत रो-रो रेल्वे सेवा सुरु

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी | अत्यावश्‍यक वस्तूंची वेगाने वाहतूक करण्यासाठी रेल्वे बोर्डाने एप्रिलमध्ये बंगळूर (नेलमंगला) ते सोलापूरपर्यंत (बाळे) पहिल्या “रोल ऑन रोल ऑफ’ (रोरो) सेवेला मान्यता दिली होती. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी रविवारी (ता. 30) या सेवेचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन केले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी अध्यक्षस्थानी होते. महसूलमंत्री आर. अशोक, जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यावेळी उपस्थित होते.

सोलापूर मधील बाळे रेल्वे स्थानकापासून 15 ट्रकद्वारे 512 टन माल बंगळुरूच्या नीलमंगला रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला आहे. रेल्वे वरती ट्रक्स घेऊन जाण्याच्या प्रकारालाच रो-रो रेल्वे सेवा असं संबोधलं जात. सोलापूर ते नीलमंगला हा प्रवास रस्त्याने केल्यास त्याला 18 ते 20 तासांचा अवधी लागतो. तर ट्रॅफिकमुळे 36 तास ही लागू शकतात.मात्र रो-रो मुळे या प्रवासाला आता फक्त 14 तासांचाच कालावधी लागणार आहे. दरम्यान रो-रो मुळे 30% प्रवासखर्च सुद्धा कमी होणार आहे.

- Advertisement -

रो-रो सेवा मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि नैर्ऋत्य रेल्वे या तिन्ही विभागात सुरु केली जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी सहा दिवस लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आवश्‍यक त्या राज्यामध्ये ही सेवा पोचविली जाणार आहे. रेल्वे वाहतुकीद्वारे रो-रो सेवांच्या माध्यमातून मालवाहू वाहनांची वाहतूक केली जाणार आहे. एका फेरीत 42 ट्रक वाहून नेण्याची क्षमता असेल. ड्रायव्हर आणि आणखी एखादी व्यक्ती ट्रकसोबत जाऊ शकते. त्यांना प्रवासासाठी द्वितीय श्रेणीची तिकीटे खरेदी करावी लागणार आहेत.

एकूण 682 किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर 1,260 टन वाहनवाहू क्षमता असेल. प्रत्येक ट्रक किंवा लॉरीतून 30 टन मालवाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून सोयीस्कर, अडथळामुक्त, स्वस्त व पर्यावरणपूरक वाहतूक करता येणार आहे. रो-रो सेवेच्या माध्यमातून कृषी, उद्योग, रसायन आदी क्षेत्रांना लाभ मिळणार आहे. ऑपरेशन ग्रीनसारख्या योजनांना चालना व शेतकऱ्यांची भरभराट होण्यास मदत होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’