शहरातील शहागंजमधील झुलेलाल मंदिरात जबरी चोरी

औरंगाबाद – शहरातील सिंधी समाजातील नागरिकांचे कुलदैवत असलेल्या शहागंजातील श्री झुलेलाल साई मंदिरात चोरट्यांनी दोन चांदीच्या मूर्ती, दानपेटीसह अनेक वर्षांपासून 24 तास तेवत असलेल्या दिव्याची समई लंपास केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सचिन परसराम करमाणी (रा.सिंधी कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंधी समाजाचे कुलदैवत असलेल्या शहागंजातील मोठ्या घड्याळाजवळील श्री झुलेलाल साई यांच्या वरुणदेव जामाश्रम मंदिरात शनिवारी मध्यरात्री दीड वाजता चोरी झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. मंदिराच्या सदस्यांनी शनिवारी सायंकाळी पूजा, आरती केली. त्यानंतर, साफसफाईसाठी नेमलेले अनिल ऐडे यांनी रात्री 8 वाजता मंदिराचा आतील लाकडी दरवाजा बंद करून, बाहेरील चॅनल गेटला कुलूप लावले. यानंतर, मंदिराच्या चाव्या सचिन करमाणी यांच्याकडे दिल्या. रविवारी सकाळी मंदिराचे सदस्य दीपक दर्डा हे दर्शनासाठी आले. तेव्हा त्यांना मंदिराच्या आतील व बाहेरील दरवाजा उघडलेला दिसला.

मंदिरातील दानपेटी, चांदीच्या दीड किलो वजनाच्या दोन मूर्ती आणि तांब्याची ऐतिहासिक समई चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मंदिराच्या सदस्य आणि पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. सिटी चौक ठाण्यात निरीक्षक अशोक गिरी यांच्या आदेशाने तत्काळ गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी फौजदार भगवान मुजगुळे यांनी सीसीटीव्ही फुटेज जमा केले. त्यात चोरट्याचा चेहरा कैद झाला आहे. या चोरीत एकूण 18 हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्या असून, दानपेटीमध्ये महिनाभराची रक्कमही असल्याची माहिती मंदिराच्या सदस्यांनी दिली.

You might also like