सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथे मध्यरात्रीच्या सुमारास सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या (शाखा वडगाव) साईडच्या बाजुला असणार्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला तसेच गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाखेतील कर्मचारी आणि भोंग्याच्या आवाजामुळे व नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तिजोरीच न फुटल्याने ते पसार झाले. त्यामुळे बँकेतील तिजोरीमधील पैसे सुरक्षित राहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील जयराम स्वामी येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याची थरारक घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. नेमके त्याचवेळी बँकेतील भोंग्याचा आवाज आल्यामुळे व संबधित अधिकार्यांनी मोबाइल द्वारे मेसेज गेल्यामुळे गावातील ग्रामस्थ बॅंकेजवळ आले. त्यामुळे चोरट्यांना गावातील ग्रामस्थ जागे झाले असल्याचा सुगावा लागल्यामुळे चोरटे तिजोरी न फोडता पसार झाले.
या घटनेनंतर घटनास्थळी औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्या सह पोलीस हवालदार राहुल सरतापे, पोलिस हवालदार किरण हिरवे यांनी तातडीने भेट दिली. बँकेच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व शहानिशा करत कोणत्याही प्रकारचे ऐवज तसेच रोख रक्कम लंपास झाले नसल्याचे स्पष्ट केले. सदरच्या घटनेबाबत अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.