सांगली प्रतिनिधी । गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यामध्ये घरफोड्यांच्या संख्येमध्ये वाढ निदर्शनास आली आहे. त्याच बरोबर काही पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डमध्ये देखील त्रुटी आढळून आल्याची कबुली कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
दरम्यान डॉ. वारके यांनी रात्री उशिरा घरी परतणार्या महिलांना घरी सोडण्यासाठी पोलीस व्यवस्था उभारण्याच्या तयारीत असून महिलांच्या मदतीसाठी ‘‘वूमन हेल्प डेस्क’’ची स्थापना देखील करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा उपस्थित होते. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर डॉ.वारके जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ.वारके म्हणाले, ”बाल अपचारींसाठी दिशा प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत चेनस्नॅचिंग च्या तुलनेत १८ ने घट झाली आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी ६९ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षी ही संख्या ५२ आहे. मात्र घरफोड्यांच्या घटनेत २१ ने वाढ झाली आहे. १६६ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. रात्री उशिरा घरी जाणार्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत सोडवण्यासाठी व्यवस्था केली जाईल. महिलांना अधिक दिलासा मिळावा यासाठी ‘वूमन हेल्प डेस्क’ची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.