पुणे । सध्या राज्यात मोठ्या शहरांमध्ये लाखो स्थलांतरित कामगार अडकले आहेत. जे आपल्या घरी परतण्याची वाट बघत आहेत. राज्य शासनाने अशा कामगारांना आपल्या घरी जाता येईल असे जाहीर केल्यापासून अनेक कामगार घरी जाण्याची आशा ठेवून आहेत. त्यांना या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कामगारांच्या रांगा सध्या सरकारी व खाजगी रुग्णालयासमोर लागल्या आहेत. मात्र अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये या कामगारांची लूट केली जात असल्याचे दिसून येते आहे. आयएमए ने याबाबतची नोंद घेऊन खाजगी डॉक्टरांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ५० ते १०० रु आकारण्याचे आवाहन केले होते. मात्र असे आवाहन करूनही या मजुरांची लूट सुरूच आहे.
कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर या खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. त्यांना उपचारासाठी दवाखाने उघडण्यासाठी वारंवार विनंती करून देखील त्यांनी आपले दवाखाने उघडले नव्हते. शेवटी सरकारला या डॉक्टरांसाठी कायदेशीर सक्ती करावी लागली होती. मात्र तरीही अनेकांनी याला जुमानले नाही. गरज असताना या डॉक्टरांनी तोंड फिरवले होते आणि आता हे मजुरांची लूट करीत आहेत. पुण्यातील बोरसे नर्सिंग होम मध्ये एका वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ३५० रुपये आकारल्याचे समोर आले आहे. या अवाजवी दरांमुळे शक्य नसणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु आहेत.
संबंधित व्यक्तीचे शारीरिक तापमान तपासणे, त्यांना सर्दी खोकला आहे का विचारणे, पूर्वी काही झाले होते का ते विचारणे असे सर्व करण्यासाठी जास्तीत जास्त १० मिनिटांचा वेळ लागतो. आणि यासाठी फार शुल्क आकारण्याची गरजही नसते. मात्र एवढ्याशा कामासाठी देखील अशा डॉक्टरांकडून लूटमार केली जात आहे. सरकारने सामाजिक अलगाव च्या नियमांचे पालन करून हे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास सांगितले आहे. आयएमए ने गरजू मजुरांसाठी कमाल १०० रु पर्यंतचे शुल्क आकारण्यास सांगितले आहे आणि अगदीच कुणाला शक्य नसेल तर माणुसकीच्या नात्याने शुल्क घेऊ नका असे आवाहन केले आहे. मात्र प्रत्यक्षात याचा फारसा परिणाम या डॉक्टरांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात लाखो कामगार या प्रमाणपत्रासाठी रांगेत उभे राहत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.