रोहिणी खडसेंच्या ‘त्या’ फोटोवर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

जळगाव । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या सगळ्यात एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रोहिणी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत एक सूचक फोटो खुद्द रोहिणी यांनी आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. या फोटोत रोहिणी हातातील घड्याळावर नजर टाकताना दिसत आहेत. त्यांच्या फोटोवर अनेकांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी खडसेंच्या निर्णयाचे समर्थन केलं आहे. तर काही जणांनी त्यांच्या निर्णयावर दुःख व्यक्त करत त्यांना नव्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार असून हा खडसे यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल, राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरु झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता असून राजकीय भूकंप करण्यासाठी फौज सज्ज झाल्याचं ही पाहायला मिळत आहे. “नाथाभाऊ जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” अशी भावना एकनाथ खडसेंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”