हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप मधील जवळीक वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. भाजप नेहमीच त्यांच्या जवळच्या पक्षाला संपवते हा इतिहास आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी जरा जपून पावले टाकावी असे रोहित पवार यांनी म्हंटल. कर्जत-जामखेडमधील वारकऱ्यांसाठी पंढरपुरात भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी रोहित पवार उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते
भाजपचा आजवरचा इतिहास पहिला तर त्यांनी नेहमीच आपल्या जवळच्या नेत्याला किंवा पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षवाढीच्या नावाखाली भाजपने शिवसेनेला संपवण्याचा प्रकार सुरू केला. त्यामुळे राज ठाकरेंनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा, आणि जपून पाऊले टाकावी असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर टीका करताना वापरलेल्या शिवराळ भाषेवरून सर्वत्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे त्याबाबत विचारले असता रोहित पवार यांनी संजय राऊतांची पाठराखण केली आहे. संजय राऊत यांनी भावनिक होऊन शब्द वापरले. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांच्या भावनांचा विचार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली असली तरी बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे, असंही ते म्हणाले.