आदरणीय पवार साहेबांना सोडून तुम्ही….; रोहित पवारांचे अजितदादांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीकाटिप्पणी करत असतात. त्यातच सध्या अजित पवार (Ajit Pawar) कोल्हापूर दौऱ्यावर आहे, त्याठिकाणी त्यांचे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे हैदराबादचे आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. मात्र टी. राजा कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाना परवानगी देऊ नये अशी साद रोहित पवारांनी (Rohit Pawar) अजितदादांना केली आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या विचारसरणी वरून खोचक टोला सुद्धा लगावला आहे.

रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी

अजितदादा,

आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे.

दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा!