हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३५ पेक्षा अधिक आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजितदादांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे २ गट विभागले गेले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कुठून उभं राहणार? तिकीट वाटपाचे अधिकार कोणाला हे सर्व प्रश्न निर्माण झालेत. या सर्व घडामोडींवर भविष्यात बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना केला असता त्यांनी रोखठोक उत्तर दिले.
आज रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना बारामती विधानसभेबाबत छेडले असता ते म्हणाले, अजित पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही, माझ्या कुटूंबातील कुणीही निवडणुकीला उभं राहणार नाही. बारामती मध्ये शरद पवार साहेबांचे व्हिजन आणि अजितदादांनी केलेल्या कामामुळे दादांनाच तिथे मतदान लोक करणार. आज बारामतीत अनेक लोक नाराज आहेत, परंतु जेव्हा विधानसभेचा विषय येईल तेव्हा अजित पवारांनाच मतदान होईल. राहिला प्रश्न लोकसभेचा, तर त्याठिकाणी बारामतीची जनता सुप्रिया सुळे यांनाच विजयी करेल असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपने खूप योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी निर्माण केलेली शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. भाजपच्या विरोधात कोणी काही बोलू नये यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडली. जेणेकरून आमच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु राहतील, आणि भाजप एसी मध्ये बसुन गम्मत बघत आहे असे रोहित पवार यांनी म्हंटल .