Saturday, June 3, 2023

आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते; रोहित आर आर पाटीलांची भावनिक पोस्ट

सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे. आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते असं म्हणत रोहित यांनी आईच्या कामाचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आई, गृहिणी, शेतातील कष्टाची कामे करणारी माझी आई. तिचा आणि राजकारणाचा कधी जास्त संबंध आला नाही. आबा राजकारणात असून राजकारण व समाजकारण जरी करत असले तरी आई राजकारणा पासून अलिप्तच होती. अचानक आबांच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर, मतदारसंघावर शोककळा पसरली. आम्ही आबा गेले आणि पोरके झालो. अशाच कठीण काळात शरद पवार साहेबांनी आईवर पोट निवडणुकी मध्ये मतदारसंघाची जबाबदारी टाकली. सर्वांच्या असलेल्या प्रेमामुळे आई पोट निवडणुकीत निवडून आली असे रोहित यांनी सांगितले आहे.

आई कुटुंब सांभाळावे इतक्या काळजीने मतदारसंघ सांभाळते आहे. आबांची कमी कधी मतदारसंघातील कोणाला काम घेऊन आल्यावर आई जाणवून देत नाही. रात्र असो दिवस असो अविरत आई लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून काम करत असते. अशी रोहित यांनी सांगितले आहे. अडचणीच्या काळात जवळचे अनेक लोक पक्ष सोडून गेली. पुन्हा एकदा मजबूत अशा प्रकारे पक्ष बांधणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणली. तसेच नव्याने उभारी घेऊन २०१९ च्या निवडणुकीत ६३ हजार मतांनी राज्यातील २०१९ विधानसभा निवडणुक मधील पहिली महिला आमदार म्हणून निवडून येण्याचा मान आईने मिळवला. असे म्हणत, आई तुझा संघर्ष खूप मोठा आहे. तुझं जसे माझ्यावर प्रेम आहे तसेच मतदारसंघावर प्रेम आहे. माझ्या इतकीच काळजी मतदार संघाची करतेस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.