नवी दिल्ली । भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाने NCA मध्ये रिहॅबिलिटेशन सुरू केले. दोन्ही स्टार खेळाडू दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकले नाहीत.
विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला गेल्या आठवड्यात वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी तो उपकर्णधार म्हणून संघासोबत जाणार होता मात्र हाताच्या दुखापतीमुळे तो जाऊ शकला नाही. त्याला बरे होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतील.
भारताचा अंडर 19 कर्णधार यश धुलच्या सोशल मीडिया पोस्टवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा NCA मध्ये दिसत होता. अंडर-19 संघ सध्या NCA मध्ये आहे, जो 23 डिसेंबरपासून यूएईमध्ये आशिया कप खेळणार आहे.
रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. जडेजा लिगामेंट टियरशी लढत आहे. जडेजाची दुखापत बरी होण्यासाठी काही महिने लागू शकतात. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तर तो आयपीएल 2022 च्या आसपासच बरा होऊ शकेल.
रोहित शर्माच्या जागी भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फक्त केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हेच सलामी देतील.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 19 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात भारताने आठ सामने जिंकले आहेत.