ठाणे प्रतिनिधी । राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमवर शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एक कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला असता त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.
मिळालेली माहिती अशी की, सुनील खांबे इतर मतदारांप्रमाणेच मतदानासाठी आले. मात्र, त्यांनी अचानक निवडणूक कर्मचाऱ्यांकडून शाईची बाटली हिसकावून ती ईव्हीएम कक्षावर फेकली. त्यामुळे काहीवेळ मतदान कर्मचारी देखील गोंधळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत खांबे यांना मतदान केंद्राबाहेर काढत ताब्यात घेतले. यावेळी खांबे यांनी ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.
यावेळी ‘मला फासावर लटकवले तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार’ असे सुनील खांबे यांनी यावेळी सांगितले आहे. ‘ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवले आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा’ असेही आवाहन देखील सुनील खांबे यांनी केले आहे.