राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rss) सहा कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून या प्रकरणी लखनऊमधील मादियानव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुलतानपूरमधील एका पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला मोबाईलवर संदेश पाठवून अलीगंजमधील आरएसएसचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. तसेच कर्नाटक येथील पाच ठिकाणी देखील स्फोट घडवून आणण्याचा इशारा दिला आहे.
या धमकी नंतर एटीएस आणि इतर गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. त्यानुसार मेसेज पाठवणार्यावर मादियानव कोतवालीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. . मादियानव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापकाने एफआयआर लिहून दिली आहे की, दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवरून मेसेज केला होता. अलीगंज येथील सरस्वती मंदिर शाळेतील आरएसएसचे कार्यालय बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. इतकेच नाही तर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने कर्नाटकातही त्यांची टीम पाच ठिकाणी ब्लास्ट करणार असल्याचेही लिहिले आहे.
दरम्यान, धमक्या देणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, अल अन्सारी इमाम राझी उन मेहंदी नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवला जात आहे. या ग्रुपमध्ये धमकीचे मेसेज आले होते. या प्रकरणाची दखल घेत अवध प्रांताच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली.