कराड : लसीकरण केंद्रावर RSS स्वयंसेवकांचा ताबा? नागरिक आक्रमक होताच पाय काढता घेतला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शासनाने ४५ वयोगटापुढील नागरिकांसाठी लस राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध केली आहे. कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध केलेली लस घेण्यासाठी नागरिक येत आहेत. सोमवारी मात्र नागरिकांमध्ये व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार घडला.

सोमवारी जास्त प्रमाणात लसी उपलब्ध झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी कोरोना लसीच्या केंद्राबाहेर गर्दी केली. यावेळी याठिकाणी स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यांनी येऊन केंद्रात हजेरी लावली. तसेच तोंड पाहून लसी देण्यास सुरवात केली असा आरोप काही लस घ्यायला आलेल्या नागरिकांनी केला आहे. सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत संघाच्या स्वयंसेवकांशी वादावादीही घातली. नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच स्वयंसेवक तेथून निघून गेले.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/563344687985380

मात्र, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात लसीवरून राजकारण केलं जात असल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी निषेध नोंदविला आहे. तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोरे यांनी दिली.

Leave a Comment