मॉस्को । कोरोना हल्ला करताना व्यक्ती किंवा पद पाहत नाही याची प्रचिती देणारी एक बातमी समोर आली आहे. जगभरातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना कोरोनाची लागण झालेल्यांच्या यादीत आता रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांचे नाव जोडले गेले आहे. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती मिखाइल यांनी स्वत: दिली. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.
काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांनी राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांच्यासोबत बैठक केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोना झाल्यामुळे स्वतःला क्वारंटाइन केले असून डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मिखाईल यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली. त्याशिवाय उपपंतप्रधान अँड्रे बेलासॉ यांना हंगामी पंतप्रधान म्हणून काम करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता उपपंतप्रधान अँड्रे बेलासॉ हे रशियाचे प्रभारी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळणार आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये रशियात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रशियामध्ये सुमारे १ लाख जणांना करोनाची बाधा झाली असून १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मिखाईल हे करोनाबाधित असलेले पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत. मिखाईल यांना ताप असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून इतर कोणती लक्षणे आढळली याबाबत अधिक माहिती समोर आली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.