हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन एस. टी. कर्मचाऱ्यांना लगेचच सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली आहे.
एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने 12 आठवड्याची मुदत दिली आहे. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू केला तर पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले.
विविध सरकारी मंडळे किंवा उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन यापूर्वीच लागू झाला आहे. याच धर्तीवर एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांच्या वेतनात वाढ होऊ शकेल, असे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. एस.टी. कर्मचाऱ्यांची सेवा सरकारी सेवेत विलीनीकरणाची मागणी असली तरी हा निर्णय घेण्यास कालावधी लागू शकतो. त्यापेक्षा सातवा वेतन आयोग लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल, अशी भूमिका मनेसेकडून मांडण्यात आली आहे