Friday, June 2, 2023

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार; देशमुखांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी अडचणीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात ईडीच्या सहाय्यक संचालकांना सचिन वाझेंनी पत्र देखील पाठवलं आहे

ईडीच्या सहाय्यक संचालकांना पाठवलेल्या पत्रात सचिन वाझे यांनी म्हटले आहे की, “मी सक्षम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर वरील प्रकरणाच्या संदर्भातील मला ज्ञात असलेल्या सर्व सत्य आणि ऐच्छिक माहिती देण्यास तयार आहे. त्यानुसार सीआरपीसी कलम ३०६, ३०७ अंतर्गत माफीचा साक्षीदार करून घेण्याची विनंती सचिन वाझे याने इडीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, कलम ३०६, ३०७ अंतर्गत माफीचा साक्षीदार करून घ्यायचे की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालयाच्या कक्षेत होतो. यासाठीच साक्ष सक्षम न्यायदंडाधिकाऱ्याच्या उपस्थितीत नोंदवून घेतली जाते. नंतर साक्षीदाराला सुनावणीवेळी न्यायालयात हजर केले जाते. परंतु जर सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाले तर अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.