हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेतेमंडळींकडून वादग्रस्त विधानाची मालिका सुरूच आहे. त्यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या एका विधानाची भर पडली आहे. सदाभाऊंनी राज्यकर्त्यांची तुलना थेट रेड्यांशी केली आहे. राज्यकर्ते हे रेड्याची औलाद असे वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यामुळे, राज्यात सुरु असलेल्या वादात नव्याने भर पडली आहे.
पुण्यात अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता, यावेळी आपल्या जाहीर भाषणात सदाभाऊ यांची जीभ घसरली. राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत असं विधान सदाभाऊ खोत यांनी केले.
दरम्यान, लाखो विद्यार्थी आशेने एमपीएस्सी परीक्षेचा अभ्यास करतात मात्र आजही त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना या सर्व प्रश्नांची माहिती आहे त्यामुळे त्यांनी याबाबत बैठक घ्यावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावे असंही त्यांनी म्हंटल.