हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, त्यातून राणेंना झालेली अटक व सुटका यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलय. शिवसेना व भाजपमधील वादात राष्ट्रवादी व काँग्रेस दोन्ही पक्ष शांतच होते. यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोला लगावला आहे. “भाजप व शिवसेनेचे जेव्हा भांडण सुरु होते. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत बसले होते. तसेच अजूनही ते मजाच बघत असल्याचा टोला खोत यांनी लगावला.
टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये फेकले. या घडलेल्या घटनेनंतर त्या ठिकाणी माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवर निशाणा साधला. यावेळी खोत म्हणाले की, शिवसेना व भाजपच्या भांडणात दुसराच कोल्हा आपले स्वत:चे हित साधत आहे. भाजप-सेना एकत्र येऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. शरद पवार यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याची तयारी केली होती हे कोणाला माहिती नसेल पण हे खरे आहे.
यावेळी खोत यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. अनिल परब यांसारख्या बुद्धिजिवी माणसाने असे करणे योग्य नाही. आग भडकवण्यासाठी, भाजप शिवसेनेत दरी वाढवण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक वक्तव्य केली गेली. मात्र, कधी दंगल झाली नाही. सरकार पुरस्कृत गोंधळ घातला गेला. ही एकप्रकारची खेळी आहे, असे खोत यांनी सांगितले.