हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडनबर्गच्या अहवालानंतर अडचणीत आलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली जात आहे. देशभरातील विरोधक सुद्धा या प्रकरणावर आक्रमक झाले असून केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले जात आहे. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात शेतकऱ्याचे कौतुक नाही पण अदानीचे कौतुक केलं आहे असं म्हणत पवार हे ओसाड गावचे पाटील अशी टीका त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ म्हणाले, आज अदानीच्या नावाने गळा काढत असताना शरद पवारांनी आपले लोक माझे सांगाती हे पुस्तक वाचावे. पवार साहेबानी त्यांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक केलं नाही पण गौतम अदानीचे कौतुक केलं आहे. अदानी हा कष्टाळू पोरगा असं त्यात म्हंटल आहे. पवारसाहेब हे ओसाड गावचे पाटील असून, त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात. कारण बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं अशी बोचरी टीका खोत यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत हे टाइम पास चॅनल असल्याचं सदाभाऊंनी म्हंटल. तसेच राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागे अजित पवार हेच कारण आहे कारण त्यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? असा टोलाही त्यांनी लगावला.