पुतण्या खळखळ करतोय अन् मग काका हातात घुंगराची काठी घेऊन वाजवतं; सदाभाऊंची कोपरखळी

0
101
sadabhau khot sharad pawar ajit pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी मधील एकूण सुरु असलेल्या राजकीय वावड्या यावरून रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. पुतण्या खळखळ करतोय अन मग काका हातात घुंगराची काठी घेऊन वाजवतं असं म्हणत सदाभाऊंनी कोपरखळी लगावली आहे. कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत सदाभाऊ बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, काका- पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राला काय नवं नाही, ते फार जुने आहे. पुतण्याला वाटलं असावं की आपल्या हातात हे म्हतारं काय कारभार देत न्हाई…म्हणून पुतण्या खळखळ करतोय … मग म्हातारं…हातात घुंगराची काठी घेऊन वाजवत… वाजवत येतया, मग त्या काठीच्या घुंगराचा आवाज ऐकून बाकी काही जण म्हणत्यात… म्हाताऱ्याच सगळं ह्यो पुतण्या एकटाच हाणील …अस सगळं त्यांचं राजकारण चाललया… असं म्हणत सदाभाऊंनी ग्रामीण रांगड्या भाषेत शरद पवार आणि अजित पवार यांचा समाचार घेतला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

राज्यातील शेतकरी ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेच्या 22 मे ला कराड ते सातारा पदयात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली. कराड येथील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन व कृष्णामाईचा आशीर्वाद घेऊन या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेत ऊस उत्पादक,काजू उत्पादक, द्राक्ष उत्पादक तसेच प्रत्येक वंचीत घटक सामील होणार आहे असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.