Video तब्बल 8 वर्षांनी हुर्रे : कोळे येथील शर्यतीत सैदापूरची बैलगाडी पहिली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कराड तालुक्यात कोळे येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पुन्हा अनुभवायला मिळाला. स्पर्धेने लक्षणीय गर्दीच्या डोळ्याचे पारणे फेडले. अंतीम फेरीत चुरशीच्या क्षणी सैदापुर (ता. कराड) येथील खाशाबा दाजी शिंदे या गाडीने प्रथम क्रमांकाचे 25 हजार 555 रूपये रोख बक्षीस व मानाची गदा पटकावली. या स्पर्धेत 150 हून अधिक स्पर्धक स्पर्धेत उतरले होते.

राज्यासह जिल्ह्यातच शर्यतीची पंरपरा पुन्हा सुरू झाली आहे. शर्यतीना उधाण आले आहे. कराड तालुक्यात बैलगाडी स्पर्धेचे आयोजन कोळेत प्रथम झाले. श्री घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेच्या औचित्य साधून तब्बल 8 वर्षानी बैलगाडी शर्यतीचा थरार कोळेत अनुभवायला मिळाला. तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार आनंदराव देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्या हस्ते उदघाटनाने स्पर्धेला प्रारंभ झाला. सरपंच संगिता कराळे, उपसरपंच समाधान शिनगारे, यात्रा समिती अध्यक्ष सुर्यकांत कुंभार, उपाध्यक्ष मुनीर भोजगर व यात्रा समिती सदस्य उपस्थित होते.

शर्यतीच्या अंतीम फेरीत सैदापूरच्या खाशाबा शिंदे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवला. दोन ते सहा क्रमांकाचे विजेते स्पर्धक अनुक्रमे पुढीलप्रमाणे देवराज पाटील (सुपने), महम्मद मुजावर (विंग), देवराज पाटील (सुपने), अनिकेत माने (गोंदी), व दरबार हॅाटेल (करवडी-भाटवडे) यांना 21 हजार 111 रूपये, 15 हजार 555 रूपये, 11 हजार 111 रूपये, 9 हजार 999 रूपये, 7 हजार 777 रूपये रोख बक्षिसे व मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

असलम देसाई, विकास पाटील, अर्जून कराळे, मुन्ना भोजगर, अंकुश पाटील, उत्तम पाटील, जावेद फकीर यांनी पंच म्हणून काम पाहिले. महपूज फकीर व नथुराम शिनगारे, मोहनीश चव्हाण यांनी झेंडापंच म्हणून काम पाहिले. रणजीत बनसोडे, बबलू देसाई यांनी सुत्रसंचालन केले. तळमावले येथील शिवसमर्थ मल्टीस्टेट को. सोसायटी, अविनाश पाटील, श्रीधन अॅग्रो इंडस्ट्रीज पुणे, रामचंद्र देशमुख व राजकुमार पाटील अंबवडे, आप्पासो देसाई आणे, व कोळेच्या नंदकुमार कांबळे यांनी बक्षिसासाठी सहकार्य केले.