हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. आरक्षणावरूनच संभाजीराजे यांनी तलवार काढण्याचा इशारा दिला होता. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढेन असा इशारा छत्रपती संभाजी राजे यांनी दिला होता. त्यावर शिवसेनेनं संभाजीराजेंना सवाल केला आहे.
जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल’, असं म्हणत शिवसेनेनं भाजपचे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.’ कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही’ असा टोला शिवसेनेनं संभाजीराजेंना लगावला आहे.
राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही. राज्यातील दोन घटनांकडे आम्ही गांभीर्याने पाहत आहोत. अद्यापि देव, मंदिरे, जिम, लोकल सेवा यांना स्थान मिळालेले नाही. ज्यांचा पुनश्च हरिओम झाला आहे, ते व्यवसायही पूर्णपणे उघडता आलेले नाहीत. रेस्टॉरंट, बार वगैरे उघडा, पन्नास टक्के क्षमतेने चालवा, असे सरकारने सुचवले; पण ते चालविताना पालिका, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांशी जो संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे धंदा करणेच नको अशी मानसिकता व्यावसायिकांत निर्माण झाली, असे दिसत आहे. असंही सामनातून म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’