मुंबई । कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे ताशेरे एका सुनावणीत गुजरात उच्च न्यायालयाने तेथील भाजप सरकारवर ओढले. याचाच आधार घेत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत जी रुग्णालये उभी केली आहेत, त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, म्हणजे त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येईल, असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून सुनावलं आहे.
उच्च न्यायालयाने गुजरातबाबत जे निष्कर्ष मांडले आहेत ते देशभरातील आरोग्य यंत्रणांचे डोळे उघडणारे आहेत. अहमदाबादमध्ये कोरोनावर उपचार करणाऱ्या मुख्य शासकीय रुग्णालयातच आतापर्यंत ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा धक्कादायक आहे. गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना न्यायालयानं बुडणार्या टायटॅनिक जहाजाशीच केली आहे. सरकारी रुग्णालयाची स्थिती ‘खतरनाक’ आहे. कोणत्याही सुविधा नाहीत. मनुष्यबळ नाही. रुग्ण तेथे मरायलाच दाखल होतात, असं न्यायालय म्हणत असल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे.
मग हे सर्व महाराष्ट्रातच का घडवले जात आहे?
गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणासारख्या राज्यांतही करोनाचा कहर आहे. गुजरातला तर न्यायालयानेच झापले, पण तेथील राज्यपालांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठका घेतल्याचे दिसत नाही. मग हे सर्व महाराष्ट्रातच का घडवले जात आहे? असा सवाल शिवसेनेनं भाजपाला केला आहे. ज्या राज्यात ऑक्सिजन सिलिंडर अभावी २०० अर्भक तडफडून मरतात त्या राज्यात सर्व आलबेल, पण महाराष्ट्रात १५ हजारावर रुग्ण कोरोनावर विजय मिळवून घरी गेले ते सरकार अपयशी ठरविण्याचे हे कुटील कारस्थान असून महाराष्ट्राचा विरोधी पक्ष या कारस्थानाचा सूत्रधार ठरत आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून राज्य सरकारची बदनामी करायची. त्यातून ‘ठाकरे सरकार’ कोलमडेल व आपला वनवास संपेल, असे दिवास्वप्न विरोधी पक्ष पाहात आहे. पण विरोधी पक्ष भ्रमात आहे. असे काही घडण्याची सुतराम शक्यता दिसत नाही असा टोला शिवसेननं भाजपाला लगावला.
विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहे
राज्य सरकारनेही एक विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. राज्य सरकारने वेगळे पॅकेज जाहीर करावे याचा अर्थ केंद्र सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटींचे पॅकेज पोकळ आणि कुचकामी आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहेत. या रिकाम्या खोक्यात रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधारकोठड्या पाहायला पाठवायला हवे, असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”