विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र, राज्य सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली. या कारणावरून स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य व केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “मेटे यांच्या अपघाताच्या घटनेला सर्वस्वी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर लवकर आपत्कालीन मदत मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे काय नियमावली आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली व माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. ही पोकळी कशी भरून निघेल याचे उत्तर आमच्याकडे नाही. बीडसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतून ते आले. गरीब मराठा समाजाला झळ बसू नये यासाठी त्यांचा लढा सुरू होता. विनायक मेटे यांनी मराठा समजाची बाजू प्रभावीपणे मांडली. मोठे बंधू म्हणून ते मला नेहमी सल्ला द्यायचे.

‘मुंबई-पुणे या मार्गावर कायम मोठी रहदारी असते. आज विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताच्या घटनेची सरकारकडून जी चौकशी केली जाणार आहे ती त्यांनी जरूर करावी, पण मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. ज्या ज्या ठिकाणी अपघात होतात अशा ठिकाणी आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी,अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केली.