हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला 3 पर्याय सूचवले आहेत. या पर्यायांवर 6 जून शिवराज्याभिषेक दिनापर्यंत विचार केला नाही, तर 7 जूनपासून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असेही संभाजीराजे म्हणाले.
“मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, या गोष्टी तुम्ही मार्गी लावा. नाहीतर मी कोविड वगैरे काहीही बघणार नाही. हा संभाजीराजे आघाडीवर असणार तिथे. समाजाला आम्हाला वेठीला धरायचं नाही. लोकांना रस्त्यावर घेऊन उतरायचं नाहीये. ६ तारखेला लोकांना नाही तर सगळ्या आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार. आता लोकांची ही जबाबदारी नाही, तर या सगळ्या खासदार, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद इथल्या सर्वांनी यायला हवं”, असं ते म्हणाले
संभाजीराजेंनी सुचवलेले पर्याय कोणते –
पहिला पर्याय – रिव्ह्यू पिटीशन फाईल करायला हवी. लोकांना दाखवण्यासाठी नको, फुलप्रूफ हवा. हे राज्य सरकारने करावं
दुसरा पर्याय – जर रिव्ह्यू पिटीशन टिकली नाही तर क्युरेटिव्ह पिटीशन अपवादात्मक परिस्थिती लागते, अवघड आहे, पण राज्याने ते करायला हवं.
तिसरा पर्याय – कलम ३४२ अ नुसार तुम्ही आपलं प्रपोजल केंद्राकडे देऊ शकता. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.
मी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांना भेटलो. माझी विनंती आहे सगळ्यांनी एकत्र या. माझा मान सन्मान गेला खड्ड्यात, तुम्ही एकत्र या, ७० टक्के गरीब मराठा समाजासाठी एकत्र या असे आवाहन संभाजीराजे यांनी केलं.
मराठा समाज आज अस्वस्थ आहे, आज माझ्यामुळे समाज शांत आहे. त्यांना उद्रेक करता येतो. त्यांनी रस्त्यावर उतरायचं का? यापुढे चालणार नाही. आम्ही चालूच देणार नाही. म्हणून पर्याय द्यायला हवा. आम्हाला तुमच्या राजकीय भांडणात अजिबात रस नाही. आम्हाला न्याय द्या”, असं संभाजी राजे छत्रपती यावेळी म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.