संभाजीराजेंचं वाढदिवसानिमित्त Facebook द्वारे वडिलांना भावनिक पत्र; म्हणाले की, आदरणीय बाबा महाराज…

Sambhajiraje Chhatrapati shahu chhatrapati maharaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापूरचे माजी खासदार संभाजी छत्रपती यांचे वडील आणि करवीर अधिपती छत्रपती शाहू महाराज यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमत्ताने संभाजी छत्रपती यांनी आपल्या वडिलांसाठी फेसबुकवरून एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वडिलांसोबतचे प्रसंगही या पत्रातून मांडले आहेत. “आदरणीय बाबा महाराज… आपल्या नात्याबाबत एकाच शब्दात सांगायचं तर… आदरयुक्त भीती असंच म्हणता येईल, असे संभाजी राजे यांनी पत्रात म्हटले आहे.

संभाजीराजेंनी फेसबुक पोस्टद्वारे लिहलेल्या पत्रात म्हंटल आहे की, आदरणीय बाबा – “महाराज” श्री शाहू छत्रपती महाराजांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस… मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांविषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर परंपरा जपण्यासाठी अहोरात्र दक्ष असणारे महाराज, बाबा म्हणून ही तितकेच संवेदनशील आहेत.

लहानपणापासून त्यांनी आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. राजघराण्यात जन्माला आल्यामुळे जो मानसन्मान, किंवा विशेष वागणूक समाजात मिळते, त्यापासून त्यांनी कटाक्षाने लांब ठेवले. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांची सुख-दुःखे समजणार नाहीत हा त्यांचा उद्देश असायचा.

https://www.facebook.com/photo.php?fbid=705903134240177&set=a.527880982042394&type=3

आमच्यावर उत्तम संस्कार व्हावेत याची काळजी बाबांनी नेहमी घेतली. शालेय शिक्षणासाठी मला राजकुमार कॉलेज राजकोट येथे पाठविण्यात आले होते. याच शाळेमध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शिक्षण घेतले होते. कोल्हापूरला सुट्टीला आल्यानंतर, सुट्टी संपल्यावर बाबा मला सोडायला दरवेळी राजकोटला यायचे. शाळा जसजशी जवळ यायची तसतसे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असत आणि महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी व त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट जाणवायची. शाळेच्या गेटवर बाबा मला मिठी मारायचे, डोळ्यातून अश्रू यायचे. राज्यसभेवर खासदार म्हणून माझी निवड झाली आणि नवीन राजवाड्याच्या पोर्चमध्ये पहिल्यांदा बाबांची भेट झाली तेव्हा मारलेली मिठी, डोळ्यातून आलेले अश्रू यातील प्रेम, जिव्हाळा, काळजी तितकीच होती, जितकी राजकुमार कॉलेजच्या गेटवर मारलेल्या मिठीत होती.

बाबांनी नेहमीच व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर केला. माझ्या लग्नावेळी वधू निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. लग्न झाले त्यावेळेची आठवण सांगताना संयोगिताराजे सांगतात, “लग्न झाले तेव्हा मी खूपच लहान होते, पण बाबांनी मला खूप समजावून घेतले. मी आपणास बाबा म्हणू का ? असे विचारले असता, माझी दोन्ही मुलं मला बाबा म्हणतात, तुम्हीपण मला बाबाच म्हणा, असे बाबांनी सांगितले. किती प्रेम, किती आपुलकी, बाबांनी खूप लाड केले. बाबांनी मला नेहमीच मुलीसारखे वागवले.”

तारा कमांडो फोर्सच्या बियासकुंड ट्रेकला बाबांबरोबर संयोगिताराजे गेल्या असता, तिथला एक प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे. रात्रीच्या वेळी कँपवर असताना, अचानकपणे वादळ व जोराचा पाऊस सुरू झाला. अनेकांच्या टेंटमध्ये पाणी येवू लागले. बाबांना काळजी वाटू लागली. संयोगिताराजेंना शोधत बाबा स्वतः पावसात कंदील घेऊन आले. सर्व सुखरूप असल्याची खात्री करून पुन्हा आपल्या टेंटमध्ये गेले. कोणत्याही कामाचे सुक्ष्म नियोजन कसे करायचे, हे बाबांकडूनच शिकण्यासारखे आहे, असे संयोगिताराजे नेहमी म्हणत असतात.

इतिहास हा बाबांचा आवडता विषय आहे, मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराजांप्रमाणेच त्यांनी इतिहास संशोधन मंडळास प्रोत्साहन देऊन मराठा इतिहास लेखन चळवळ पुढे चालू ठेवली. यातून अनेक ग्रंथांची निर्मिती झाली आहे.

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शैक्षणिक कार्यात केलेल्या कार्याचा वसा घेऊन सामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी बाबांनी छत्रपती शाहू विद्यालयाची स्थापना केली. इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषा सक्ती बाबांनी केली, कारण मातृभाषा अवगत असल्याशिवाय मातृभूमीशी नाळ जोडली जात नाही, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

साहसी वृत्ती समाजामध्ये रूजावी या उद्देशाने करवीर संस्थापिका महाराणी ताराबाई राणीसाहेब यांच्या नावाने तारा कमांडो फोर्स (T.C.F.) ची स्थापना केली आहे. बाबा क्रीडाप्रेमी आहेत. कुस्ती आणि फुटबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. आणि हेच संस्कार माझ्यात व शहाजींमध्ये आलेले आहेत. नवीन राजवाड्याच्या लाल आखाड्यातील माती अंगाला लागली. कुस्ती बरोबरच फुटबॉल, क्रिकेट, घोडेस्वारी, स्विमिंग याची आवड बाबांमुळे निर्माण झाली. बाबा स्वत: शाळेवरील टाकीत मला पोहायला शिकवायचे. यातूनच माझ्यात खेळाडूवृत्ती आणि धाडसीपणा निर्माण झाला.

माझ्या मनात बाबांविषयी नेहमी आदराचेच स्थान आहे. बाबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, मनःशांती आणि आनंद मिळो हीच प्रार्थना ! आम्ही आपल्या छत्रछायेखाली राहो आणि आपले मार्गदर्शन सतत राहो हीच सदिच्छा ! आम्हा तिघांच्या अंत:करणात बाबांचे स्थान असीम आहे. बाबा आणि माझे नाते एका शब्दात सांगायचे झाले तर… एकच शब्द येतो, तो म्हणजे म्हणजे आदरयुक्त भिती, अशी फेसबुक पोस्ट संभाजीराजेंनी केली आहे.