कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील राजमाची येथे कराड ते विटा मार्गावर सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी आज उधळून लावला. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 10 आरोपींना पोलिसांनी शिताफितीने पकडले असून संशयित आरोपींकडून 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींकडून 9 लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी ता. कराड जि. सातारा), अखिलेश सुरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड), धनंजय मारुती वाटकर (रा.सैदापूर कराड), वाहीद बाबासाो मुल्ला (रा. विंग ता. कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (रा. मलकापूर, ता. कराड), चेतन शाम देवकुळे (रा. बुधवार पेठ महात्मा फुलेनगर, कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ कराड), हर्ष अनिल चंदवाणी (रा. मलकापूर, ता. कराड), तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची, ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कराड येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दरोड्याच्या कारवाईबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, दरोडा टाकण्याच्या हेतुने जमलेल्या दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किमतीची 14 देशी पिस्टल व 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील राजमाची येथे सातारा गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; 10 दरोडेखोरांसह 14 पिस्टल अन् 22 काडतूस जप्त
कराड तालुक्यातील राजमाची येथे मोठी कारवाई pic.twitter.com/ig9Xb6efTy
— santosh gurav (@santosh29590931) March 28, 2023
पोलीस उपअधिक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी कराड शहरात कोबींग ऑपरेशन राबवत असताना खबऱ्याकडून त्यांना गोपनीय माहिती मिळाली. यामध्ये कराड-विटा मार्गावर जानाई मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात काही लोक दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी दरोडेखाऱ्यांना पोलीस आल्याची माहिती मिळताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी 10 दरोडेखोरांकडून 9 लाख 11 हजार 900 रुपये किंमतीच्या 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जीवंत काडतुसे, मिरची पुड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला. या दहा जणांविरुध्द कराड शहर पोलीस ठाण्यात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याचे शेख यांनी सांगितले.
दरम्यान, कराड येथील कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपधिक्षक रणजित पाटील याच्या सुचनेनुसार परि. पोलीस उपअधिक्षक अजय कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे.