हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर साताऱ्यात राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच शशिकांत शिंदेंचा गेम केला अशी चर्चा रंगली होती. यानंतर शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक केली. या संपूर्ण घडामोडी वर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य केले आहे. शशिकांत शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीच्याच लोकांचा हात आहे असा आरोप शिवसेनेनं केला.
सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे हेवीवेट शशिकांत शिंदे फक्त एका मताने पराभूत झाले. त्यांच्याच पक्षाचे एक साधे कार्यकर्ते रांजणे यांनी शिंदे यांचा पराभव केला. त्यामुळे शिंदे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यालयावर हल्ला केला, दगडफेक केली. शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यात राष्ट्रवादीचेच लोक सक्रिय होते. शिद यांचा पराभव का झाला? कोणी केला? हा प्रश्न शिवसेनेनं केला.
सातारा बँकेत रामराजे निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, शेखर गोरे वगैरे प्रमुख लोक निवडून आले, पण शशिकांत शिंदे यांना ठरवून पाडले गेले. शिंदे यांचा विजय झाला असता तर जिल्हय़ातील सहकाराची सूत्रे त्यांच्या हाती गेली असती. शिंदे हे श्री. शरद पवार यांचे कडवट अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांना पराभूत करून कोणी बाजी मारली? असा सवाल शिवसेनेनं केला.