टीम, HELLO महाराष्ट्र। नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात भाजप विरुद्ध बाकी सर्व विरोधी पक्ष असं चित्र सध्या रंगताना दिसत आहे. सेलिब्रिटी मंडळींनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची कन्या सना गांगुली हिने ही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘का’ कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘जामिया’च्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचं प्रकरण देशभरात चर्चेत आहे. याच प्रकरणावर सना गांगुली हिने केलीली एक इंस्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
सना गांगुलीने खुशवंत सिंह यांच्या ‘द एंड आफ इंडिया’ या पुस्तकातील काही भाग शेअर करुन देशातील सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘आपल्यापैकी ज्यांना वाटतंय की ते मुस्लिम नाहीत त्यामुळे सुरक्षित आहेत ते मुर्खांच्या जगात जगतायेत’, अशा आशयाचा संदेश सनाने पोस्टमध्ये टाकला आहे. सनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ती पोस्ट दिसत नाहीये, पण सोशल मीडियावर पोस्टचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, सौरव गांगुलीने स्वतः सनाच्या व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण देताना, ती व्हायरल पोस्ट खोटी असल्याचं म्हटलं आहे. तसंच सनाला अशा मुद्द्यांपासून दूर ठेवा असं आवाहन केलं आहे.