कराड | चंदन चोरी करणाऱ्या चोरट्यांवर कराड वन विभागाने चार जणांवर कारवाई केली. एक दुचाकीसह पोत्यात भरलेले चंदनाचे तुकडे, तोडणीसाठी वापरलेले साहित्य जप्त करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन बाळासाहेब मदने (किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा), विकास दाजीराम मदने, मोहन हिंदुराव माने व बाबासाहेब गोपाळ माने (सर्व रा. विंग, ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत.
वन विभागाने दिलेली माहिती अशी, मलकापूरचे वनरक्षक रमेश जाधवर चचेगाव- विंग परिसरात गस्त घालत असताना येथील कॉंड्रामॅटिक ते जामदार वस्ती परिसरात चार जण संशयितरीत्या फिरताना त्यांना आढळली. संशय आल्याने श्री. जाधवर यांनी त्यांना विचारणा केली. यावेळी संबंधितांकडे एका दुचाकीसह, पोत्यात भरलेले चंदनाचे तुकडे, एका पिशवीत कुदळ, दोन कुराडी, चार गिरमिट व एक करवत सापडले. चंदन चोरीचा प्रकार समोर आल्याने वन विभागाने संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे.
साताऱ्याचे उपवनसंरक्षक उत्तम सावंत, सहायक वन संरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले व त्यांचे सहकारी तपास करत आहेत. अनेक दिवसांपासून विंगसह परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावरील चंदनाच्या झाडाच्या चोरीचे सत्र सुरू आहे. मात्र, चोरटे सापडत नव्हते. चंदन चोरट्यांवर कारवाई केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.