सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
सांगलीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ऐन वेळी आलेल्यांना आणि आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली जात आल्याचा आरोप होत असतानाच आता पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. बुधगाव मध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी दिलेल्यांकडून अपमान होत असल्याचा आरोपही या बैठकीत कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला.
भाजपाच्या जेष्ठ नेत्या असतानाही नीता केळकर यांच्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. पक्षासाठी त्यांनी ४० वर्षे काम केलं असताना त्यांच्यावर अन्याय कशासाठी केला जातो? नीता केळकर यांच्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जबरदस्त आणि आक्रमक महिला नेत्यावर आज अडगळीत बसायची वेळ का आली आहे.एकीकडे भाजपा महिला सक्षमीकरणाचा नारा देत असताना दुसरीकडे केळकर यांच्या सारख्या आयुष्य व्यथित केलेल्यांना पदापासून वंचित ठेवले जात आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये केला.
मुख्यमंत्र्याच्या जनादेश यात्रेच्या निमित्ताने निता केळकर या गावोगावी फिरून भाजपाच्या कार्यकर्त्यांना भेट आहेत. मात्र या वेळी त्यांनी निवडणुकीत लढावं असा असा सल्ला त्यांना निष्ठावान देत आहेत तर विद्यमान आमदाराबाबत असंतोष दिसून येत आहे. पक्षात मूठभर लोकं असताना निष्ठावानांनी पक्षाची धुरा सांभाळली आणि पक्ष टिकवला मात्र आता भाजपामध्ये नव्याने आलेल्या आणि आयारामाना अधिक स्थान आणि किंमत असल्याचे भाजपा चे निष्ठावंत बोलत आहेत.
त्यातच सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून कार्यकर्ते आणि जनतेला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा तक्रारीचा पाढाही बैठकीत कार्यकर्त्यांनी वाचला. त्यामुळे आता सांगलीतून केळकर यांनाच उमेदवारी देण्याची आग्रही मागणी कार्यकर्त्याकडून केली जात आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांना बोलताना नीता केळकर यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून त्यासाठी आग्रही असल्याचंही सांगितलं.