सांगली प्रतिनिधी। सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील यांना कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांच्याकडे केली. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देखील मागणीचे निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णू अण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगली विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाकडून कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील, सुभाष खोत प्रमुख इच्छूक आहेत. त्यांनी पक्षाकडे रितसर उमेदवारी मागितली आहे.
आता विधानसभेच्या निवडणुका महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील या विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार की नाही? अशी शंका होती. मात्र मदनभाऊ गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेत विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यांनी देखील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार विधानसभा लढण्यास ग्रीन सिग्नल दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मदनभाऊ गट आता जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी मिळविण्यासाठी सरसावला आहे.
आज विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कडेगाव येथे कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांची भेट घेतली. मदनभाऊ पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी, आम्ही जिवाचे रान करून त्यांना निवडून आणू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. विश्वजीत कदम यांनी सांगली विधानसभेच्या उमेदवारीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.