सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना शनिवारी आणखी एक कोरोनाचा बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 17 झाली. कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दमधील 52 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यूू झाला. याशिवाय अथणी (जि. विजापूर) येथील 55 वर्षाच्या बाधित पुरुषाचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने 15 रुग्णांची नोंद झाली.
सांगलीत पाच तर मिरजेत तीन रुग्ण आढळले. जत तालुक्यातील बिळूरमध्ये पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. कवठेमहांकाळमधील कुचीमध्ये महिला, मिरज तालुक्यातील कर्नाळमध्ये पुरुष, कडेगाव येथे 70 वर्षाचा वृद्ध बाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 632 वर गेली असून सद्यस्थितीत 310 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कडेगाव तालुक्यातील भिकवडभ खुर्दमध्ये 52 वर्षीय पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्या व्यक्तीला भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्या व्यक्तीची कोरोना चाचणी घेतली असता तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या बळींची संख्या 17 वर पोहोचली आहे.
याशिवाय जिल्ह्यात नव्याने 15 रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. कर्नाटक राज्यातील अथणी येथील 55 वर्षाच्या कोरानाबाधित पुरुषावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्या व्यक्तीचा मृत्यूही झाला.महापालिका क्षेत्रात आठ रुग्णसांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात शनिवारी दिवसभरात 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील चार जण कोरोना बाधितांच्या संपर्कातील असून अन्य दोन नवे रुग्ण आहेत.
सांगली खणभाग भांडवले गल्लीतील एक 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या व्यक्तीला ताप आला होता. त्यामुळे सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखवल्यानंतर त्यांना मिरज कोविड हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. याचबरोबर वारणाली आमंत्रण हॉटेल शेजारी राहणाऱ्या एका रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या 25 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या परिसरात असणाऱ्या कृष्णाई वसाहतमधील 36 वर्षीय महिलाही पॉझिटिव्ह आली आहे. दत्तनगर कंटेन्मेंट झोनमधील एका 39 वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरज सिव्हील मध्ये दाखल केले असता त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला.
याचबरोबर मिरजेतील रेवणी गल्लीतील एक 25 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. मिरज मधल्या साठेनगर येथील एका रुग्णालयात काम करणारी 28 वर्षीय परिचारिका, याशिवाय 25 वर्षाचा तरुण आणि 55 वर्षाचा पुरुषाचा अहवालही पॉझिटव्ह आला आहे. मिरज तालुक्यातील कर्नाळमध्ये पुन्हा एक रुग्ण आढळून आला. तेथील 36 वर्षाचा तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.हॉटस्पॉट बिळूरमध्ये पुन्हा तीन रुग्णजत तालुक्यात हॉटस्पॉट बनलेल्या बिळूरमध्ये पुन्हा तीन रुग्ण आढळून आले. 65 वर्षीय वृद्धा, 38 वर्षाचा पुरुष आणि 15 वर्षाची मुलगी यांच्याकडे कोरोनाची लक्षणे होती. त्यांची प्राथमिक तपासणी जतमध्ये केली होती. त्यापुढील तपासणीसाठी मिरजेतील कोविड रुग्णालयात स्वॅब घेतले असता ते सर्व जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुचीमध्ये 52 वर्षीय महिला, तसेच कडेगाव येथे 70 वर्षीय वृद्धामध्येही कोरोनाची लक्षणे होती. या सर्वांचे कोरोनाच्या तपासणीसाठी स्वॅब घेतले होते. त्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याशिवाय बाधित रुग्णापैकी शनिवारी सात जण कोरोनामुक्त झाले.अकरा जण अतिदक्षता विभागातसध्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी अकरा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.