हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. यानंतर अजित पवार यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्री पद आता अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे विधानसभेचे नवीन विरोधी पक्षनेते कोण असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या विरोधी पक्षात काँग्रेसकडे सर्वाधिक ४४ आमदारांचे संख्याबळ असल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार हे नक्की आहे, परंतु पक्षाकडून अद्याप नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. त्याच दरम्यान, आता मोठी बातमी समोर येत आहे. भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी फिल्डिंग लावली असून थेट हायकमांडला पत्र पाठवलं आहे.
संख्याबळामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार असल्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी हायकमांड आणि अध्यक्षांना पत्र लिहले आहे. विरोधी पक्ष नेतेपदासाठी ३० आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा थोपटे यांनी केला आहे. संग्राम थोपटे यांच्या पत्राची दखल घेत आज काँग्रसने विधान भवनात बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज विरोधी पक्षनेता पदासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची नावे विरोधी पक्षनेतेपदासाठी सुचवण्यात आली होती. मात्र आता ही नावे मागे पडून संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. थोपटे यांनी आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र काँग्रेस हायकमांडला पाठविले आहे. जर आजच्या बैठकीत थोपटे यांच्या बाजूने निकाल लागला तर विरोधी पक्षनेते पद थोपटे यांच्याच हातात जाईल.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक आमदार झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसच्या हाती जाणार आहे. या पदासाठी काँग्रेसच्या आमदारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अद्याप काँग्रेस पक्षाकडून देखील विरोधी पक्षानेत्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आले नाही.