एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या हातून संपवण्याचा डाव.., राजकिय वर्तुळात खळबळ

eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून संपवण्याचा डाव होता” असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे.

यावेळी संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, “उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकनाथ शिंदे यांना दुसरं काही देणार नव्हते, तर मौत देणार होते. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचा एन्काऊंटर करणार होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या हत्येचा कट करण्यात आला होता. नक्षलवाद्यांकडून त्यांना धमकीही आली होती. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज होती. त्यानुसार झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, ‘मातोश्री’नं त्यास विरोध केला होता”

त्याचबरोबर, “एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भात गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी एकदा बैठक सुरू असताना मातोश्रीवरून फोन आला. शिंदेंची सुरक्षा वाढवू नका, असं सांगितलं गेलं. याचा अर्थ शिंदे यांना वाटेतून दूर करण्याचा प्लान होता. शिंदे राजकारणातून संपत नाहीत म्हणून त्यांना संपवण्याचा हा डाव होता. त्यामुळंच त्यांना सुरक्षा नाकारली गेली हे स्पष्ट आहे” असा देखील आरोप गायकवाड यांनी लावला आहे.

दरम्यान, संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपाननंतर ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या या दोन्ही गटात सतत वाद पाहिला मिळत आहे. अशातच शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांविरोधात वक्तव्य करताना दिसत आहे. आता गायकवाड थेट ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे पुन्हा दोन्ही गटात ठिणगी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.