हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक पार पडणार असून आज शिवसेना उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर दुसरीकडे सकाळपासून ईडीच्यावतीने मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉंड्री प्रकरणी कारवाई केली जात असल्याने यावरून राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपाकडून दबावतंत्र सुरू आहे. आम्ही अशा कुणाच्याही दबावाला भीक घालत नाही, अशी टीका राऊतांनी केली.
राज्यसभेसाठी संजय राऊत व संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह संपूर्ण महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत यावेळी ते म्हणाले की, भाजपाने तिसरा, चौथा, पाचवा उमेदवार द्यावा.
आम्ही आमच्या जागा निवडून आणू. ईडी, सीबीआय हे दबाव टाकून त्यांच्या जागा जिंकून येणाऱ्या असतील, तर त्यांनी प्रयत्न करत राहावेत. आमची काही अडचण नाही. देशात लोकशाही आहे. आमच्या जागा लढण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही, असे राऊत यांनी म्हंटले.
एक दिवस ही सूत्र आमच्याकडे असतील
यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी राऊतांनी गर्भित इशाराही दिला. ते म्हणाले की, या सर्व कारवाया फक्त राजकीय सूडबुद्धीने आणि बदल्याच्या भावनेने सुरू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला काय चालले हे माहिती आहे. हा काळही निघून जाईल आणि एक दिवस ही सूत्र आमच्याकडे असतील, असे राऊत यांनी म्हंटले.