हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय तपास यंत्रणांच्यावतीने केल्या जात असलेल्या कार्रवाईवरून आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडून विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा जाणीवपूर्वक वापर केला जात आहे असे काम हिटलरनेही केले नव्हते अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सत्ताधारी भाजप सरकारविरोधात भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींविरोधात अशा यंत्रणांकडून राजकीय सूड, द्वेष भावनेतून कारवाई केली जात आहे. मु्ंबईत अनिल परब यांना आज ईडीकडून नोटीस आली आहे. दिल्लीतही मागील तीन दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी यांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. ही हुकूमशाहीची सुरुवात आहे, असे मी मानत नाही. पण हुकूमशाहीने आता टोक गाठले आहे.
आपली सत्ता टिकवण्यासाठी राजकीय विरोधकांना संपवण्याचे असे काम हिटलरनेदेखील केले नसेल. मात्र, आज केले जात आहे. ज्या भारत देशाचा लोकशाहीचा डंका जगभरात वाजवला जातो. त्याच देशात आज लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्यामुळे आता आपल्याला आणखी एका स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे सूचक विधान राऊत यांनी यावेळी केले आहे.