हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांच्या शपथविधीबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दोघांनाही राज्य चालवण्याच्या शुभेच्छा. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आणि आता मुख्यमंत्र्यांच्या कामात आम्ही कोणताही अडथळा निर्माण करणार नाही, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
सन्जय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी शुभेच्छा देत आहे. आमच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या कामात कोणताही अडथळा निर्माण करण्याचे काम केले जाणार नाही. फडणविसांच्याबाबत सांगायचे झाले तर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावे हीच अपेक्षा आहे.
भाजप या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच फडणवीस यांनी काल पाळला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आम्ही एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे कदापी म्हणणार नाही. कारण जिथे ठाकरे तिथे शिवसेना असे आम्ही मानतो. ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, असेही राऊत यांनी यावेळी म्हंटले.