हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर हल्लाबोल केला आहे. “काल अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. वास्तविक औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता. हे याद राखा. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्याच्या कबरीवर तुम्ही दर्शनासाठी जात असेल तर एक दिवस तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल हे लक्षात ठेवा, असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह अकबरुद्दीन ओवेसी याच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “संभाजीनगरला येऊन औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. हे महाराष्ट्राला अशांत करण्याचे एक प्रकारचे राजकारण ओवेसी बंधू करत आहेत. ज्याने महाराष्ट्रावर चाल केली त्याची अवस्था काय झाले हे माहिती आहे काय? महाराष्ट्रावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहिला. त्याला कधीच यश मिळाले नाही.
औरंगजेब याच्या कबरीपुढे नतमस्तक व्हायला तो काही साधू संत नव्हता. इतिहास तुम्हाला सर्व माहिती देईल. औरंगजेबाच्या कबरीवर महाराष्ट्राला आव्हान देण्याची गोष्ट तुम्ही करत असाल तर ते आव्हान आम्ही स्वीकारले आहे. जे औरंगजेबाचे झाले तेच त्याच्या भक्तांचेही होईल हे नक्की.
‘मविआ’च्या नेत्यांनी काळजीपूर्वक बोलावं – राऊत
यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांनी काळजीपूर्वक विधाने करायला हवीत. महाविकास आघाडीला तडा जाईल अशा प्रकारचे काम कुणीही करू नये.