हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला काल शिंदे – फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. या मुद्यांवरून आज शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, शिंदे- भाजप सरकारने नामांतरच्या निर्णयाला स्थगिती दिली. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? वास्तविक हे सरकार हिंदुत्ववादी आणि ढोंगी आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “शिंदे – भाजप सरकार बेकायदेशीर आहे. या सरकारबाबतचा निर्णय अद्याप कोर्टात आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या पाच निर्णयाला या नव्या सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रद्रोही आहे. संभाजीनगर कधी करणार, हा प्रश्न भाजप अनेक वर्षांपासून विचारत होते. दि. बा. पाटील यांच्या नावासाठीही मोर्चे काढत होते. उद्धव ठाकरे यांनी कुणाचीही पर्वा न करता हे निर्णय घेतले.”
एकिकडे हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करत आहात आणि दुसरीकडे हिंदुत्वासाठी जे निर्णय घेतले, त्यांना स्थगिती कशासाठी देत आहात?असा सवाल राऊत यांनी यावेळी शिंदे- भाजप सरकारला विचारला आहे.