हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यवर नुकतीच टीका केली. त्यांच्या टीकेला आता राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत. यांच्यासारखे आम्ही पळपुटे नाही. आम्हाला ईडीची नोटीस आली कि आम्ही तुमच्यासारखा पळून गेलो नाही. मी नामर्द नाही, एक सांगून टाकतो माझ्या कुणीही नादाला लागू नका. मी जर आर्थिक प्रकरणे बाहेर काढली ना तर ५० वर्ष नारायण राणे सुटणार नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी राणेंना थेट इशारा दिला.
मुंबईत संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नारायण राणे यांच्या सारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्षही बदललेला नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते त्यामुळे मी अजून त्यांच्यावर काहीच बोललेलो नाही. मात्र, आज बोलतो. आम्हाला धमक्या देऊ नका. आणि धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका, झाकली मूठ सव्वा लाखांची.
परत सांगतो मी हे काय मला जेलमध्ये टाकणार? मी माझ्या हिंमतीने जेलमध्ये गेलो आहे माझ्या पक्षासाठी. तुमच्यासारखा पळून नाही गेलो ईडीने बोलवल्यावर शरणागतीही पत्करली नाही, आम्ही नामर्द नाही आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवा, मला टाकणार का जेलमध्ये. या सर्व्ह नोंदी आहेत माझ्याकडे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.